सुर्ला येथील जमिनिच्या हेराफेरी प्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक
आदिवासीच्या जमिनी लाटल्याचा आरोप
प्रतिनिधी/ मारेगाव...पंकज नेहारे
मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुर्ला ता.झरी साज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संगनमताने दीडशे हेक्टर शेतजमिनीचे मालकी हक्कात फेरबदल करुन अफरा तफर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून शासनाने शेतकऱ्यांना मदती पोटी पाठवलेल्या ३लाख ४१ हजार ३६० रुपये रकमेचे चुकीचे वाटप केल्याचे उघड झाल्यामुळे या प्रकरणी तलाठी विजय निखार यांना या पुर्वीच तर त्याला मदत करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला मारेगाव पोलिसानी ता.५ मार्च रोजी अटक केली आहे.
दरम्यान झरी तालुक्यातील सुर्ला साज्यात विजय गजानन निखार हे तलाठी म्हणून कार्यरत असताना या साज्या अंतर्गत येणाऱ्या गावातील १४८.३६ हेक्टर शेत जमिनिच्या सात बारा मध्ये खोडतोड करुन अनेक शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र कमी करुन दुसऱ्याचे क्षेत्र वाढवून देण्याचा प्रकार घडला. तर अनेक खोट्या सातबारावर खरेदी विक्रिचे व्यवहार केल्याचे प्रकारही उघडकीस आले असुन आदिवासीची शेती गैरआदिवासीना खरेदी करता येत नसताना अनेक आदिवासीचे शेत गैरआदिवासींच्या नावे केल्याचा ही प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानी पोटी सुर्ला साजात दिलेल्या निधीतील ३ लाख ४१ हजार ३६० रुपयाचा निधी बोगस लाभार्थ्याना वाटप केल्याचेही उघड झाले आहे.
शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे रेकार्ड व्यवस्थीत न ठेवणे रेकार्ड मध्ये खाडाखोड करणे इत्यादी मध्ये अनियमितता असल्याचा तपासा मध्ये प्रकार समोर आला असुन हा प्रकार समोर येताच शेतकऱ्यात खळबळ निर्माण झाली. आता हक्काच्या शेतीचे काय होईल ही भिती आहे. या प्रकरणी तलाठी विजय निखार यांना तीन महिन्या पुर्वीच निलंबित करुन अटक केली होती.सध्या तलाठी कारागृहात आहे. या प्रकरणी आता तलाठ्याला हेराफेरी मध्ये मदत केल्या प्रकरणी विविध कलमा खाली मंडळ अधिकारी दीपक मनवर यांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणाने महसुल विभागात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पज्जलवार, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षक अमोल चौधरी, मनोज बोढलकर, अनिल गिनगुले करीत आहेत.