बोटोणीत डासांच्या प्रादूर्भावाने आरोग्य प्रभावित
🔸ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज
बोटोणी येथे रस्ता तिथे सांडपाणी अशी विदारक अवस्था असतांना डासांचे प्रमाण कमालीचे वाढून नागरिकांचे आरोग्य प्रभावित होत आहे.स्थानिक प्रशासन चुप्पी साधून असतांना ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
यंदाच्या सातत्याने येत असलेल्या पावसाने बोटोणी येथे रस्ते व नाली अभावी जागोजागी गढूळ पाण्याचे डबके साचले आहे , केरकचरा व सांडपाण्यानेही डासांच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य प्रभावित होत आहे.
दरम्यान , नागरिकांत हिवताप , सर्दी , खोकल्याचे प्रमाण बळावले आहे.जागोजागी सांड पाणी , काही ठिकाणी तुडूंब भरलेल्या नालीमुळे बोटोणीतील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.यास ग्रामपंचायत सह आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.परिणामी यावर उपाययोजना करण्यासाठी नाली सफाई , डासांची फवारणी करून प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.वाढत्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाला अंकुश लावावा व नागरिकांना दिलासा द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.