टाटा एस ने दुचाकीस्वारांना उडविले
🔸एक जागीच ठार तर एक जखमी
🔸मृतक इसम कोरपना तालुक्यातील
🔸गौराळा फाट्यानजीक झाला अपघात
मारेगाव : प्रतिनिधी
वणी वरून भरधाव वेगाने येत असलेल्या टाटा एस वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर दुचाकीस्वार सहकारी जखमी झाल्याची घटना सकाळी ११.३० च्या दरम्यान गौराळा फाट्यानजीक घडली.
बाळकृष्ण महादेवराव पाचभाई (६१) मु.कवठाळा पो.नांदगाव ता.कोरपना जी.चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव असून त्याचा सहकारी जखमी आहे. वृत्त लिही पर्यंत जखमीची ओळख पटली नसून त्याचेवर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे तर मृतक महादेवराव पाचभाई यांचा मृतदेह मारेगाव रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
दरम्यान टाटा एस वाहन वणी वरून मारेगावकडे येत असतांना दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने जात होते.राज्यमहामार्गावरील खड्डा वाचविण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.