आत्महत्येची धग...
अतिवृष्ठीने घेतला शेतकऱ्याचा बळी
🔸मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील शेतकऱ्याने घेतले विष
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आत्महत्येचे सातत्य सुरू असतांना मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने रविवारला मोनोकॉल नामक विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली.यंदाच्या झालेल्या अतिवृष्ठीने शेती लयास गेल्याने सदर शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
तोताराम अंगत चिंचुलकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांचे कडे २३ एकर शेती दांडगाव शिवारात आहे.यंदाच्या अतिवृष्ठीने तब्बल दहा एकर शेती खरडून गेली.उर्वरित शेतातील पिके पाण्याखाली आल्याने उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता त्याला अस्वस्थ करीत होते.अशातच राजूर बँकेचे , कृषी केंद्र व खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत मागील काही दिवसांपासून असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली.
रविवार दि.२८ ऑगष्ट रोजी स्वतःचे घरी सकाळी दहा वाजता मोनोकॉल नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन केल्यानंतर तोताराम यांना वणी येथे दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.मृतकाच्या पश्चात व आई ,वडील , पत्नी व १८आणि १६ वर्षीय दोन मुली आहेत.
तालुक्यातील सातत्याने होत असलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला असून एक दोन दिवसाआडील आत्महत्येने मारेगाव तालुका प्रभावित झाला आहे.सलग होत असलेल्या आत्महत्येला अतिवृष्ठीची नाळ जोडली जात आहे.