थरार....
वाघाचा रानडुक्कर मागे पाठलाग..वाघासमोर पडले दुचाकीस्वार अन पाडला गाय-म्हैसचा पडशा..!
🔸बोटोणी खैरगाव रस्त्यावर भर दुपारी भागमभागचा थरार
मारेगाव : दीपक डोहणे
गुरुवार दिवस.वेळ दुपारी एक वाजताची.दुचाकीवर दोघे खैरगाव (भेदी ) कडे निघालेत.तोच घनदाट जंगलातून सैरभैर होत रानडुकराचा पट्टेदार वाघ पाठलाग करतोय.सुसाट वेगाने रानडुक्कर रस्ता ओलांडत असतांना दोघे दुचाकीस्वार अगदी वाघाच्या समोर भेदरलेल्यावस्थेत पडतात व ओरडू लागतात. या आरडाओरडीने पट्टेदार वाघ घनदाट जंगलात माघारी फिरतो व अवघ्या काही वेळातच गाय - म्हैसचा पडशा पाडतो. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नव्हे तर वास्तवात घडलेला प्रसंग भेदरलेल्या व वाघाच्या जबड्यातून सुटका झालेल्या युवकांनी घडलेला थरार व आपबिती कथन केलीय थेट ' विदर्भ सर्च न्यूज नेटवर्क ला.
हिरवेकंच व घनदाट रोहीपठार जंगल बोटोणी वरून खैरगाव (भेदी ) कडे जातांना सर्वश्रुत आहे.मागील अनेक दिवसांपासून घनदाट जंगलात वाघाचा मुक्त वावर आहे.या पूर्वी दोन तीन घटनांत वाघाने पशुधनाचा पडशा पाडला त्यामुळे परीसरात प्रामुख्याने शेतकरी शेतमजुरात प्रचंड भितीचे सावट आहे.
दरम्यान , गुरुवारला वसंतनगर येथील दिलीप आत्राम व सुमित चव्हाण हे मारेगावचे काम आटोपून बोटोणी मार्गे दुचाकीने गावी जात होते.बोटोणी वरून निघताच रोहीपठार हे घनदाट जंगल सुरू होतेय.दुचाकीने दुपारी एक वाजता निघालेले या तरुणा समोरच पट्टेदार वाघ रानडुक्कर चा पाठलाग करीत असल्याचे दिसले.रानडुक्करने रस्ता ओलांडला आणि डावीकडे सुसाट वेगाने पळाला तर वाघ हा उजव्या बाजूला रस्त्याच्या कडेला होता.याच वेळी वाघाला पाहून दुचाकीस्वार दोघेही भेदरले व प्रचंड भीतीने दुचाकीसह रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले अन जोरजोराने आरडाओरड केल्याने त्या पट्टेदार वाघाने समोर न येता माघार घेत जंगलाच्या दिशेने कूच केले आणि अघटीत ओढवणारा प्रसंगाचा त्या युवकांनी निःश्वास सोडीत लगबगीने या थरारक घटनास्थळावरून पळ काढला.
डोळ्यासमोर आलेल्या जीवघेण्या प्रसंगांची आपबिती आणि थरकाप उडवून देणाऱ्या घटनेचा परामर्श आणि थरार भेदरलेल्या युवकांनी निःशब्द पणाने विदर्भ सर्च न्यूज जवळ कथन केलाय.
दरम्यान , वाघाने जंगलात पोबारा करून अवघ्या काही तासातच बोटोणी येथील विजय आसेकर यांची दहा हजार रुपये किमतीची गाय व अरुण नागोसे यांची ३५ हजार रुपये किमतीच्या म्हैस चा पडशा पाडला.
वाघाच्या दहशतीने शेतकरी तथा शेतमजुरात भितीचे सावट दिवसागणिक वाढत आहे तर वाढत्या पशुधनाच्या नुकसानीने पूर्वीच आर्थिक मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याची प्रचंड ससेहोलपट वनविभागाने थांबवावी व तात्काळ आर्थिक मदत प्रदान करावी अशी आर्जव मागणी पिडीत शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.