पोलिसांना आव्हान की मिलीभगत..?
ग्रामिण भागात पाण्याचा तर मारेगावात अवैध दारूचा महापूर
🔸ड्रायडे ला मारेगावात खुलेआम विक्री
मारेगाव : प्रतिनिधी
मागील चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असून तालुक्यात बहुतांश ठिकाणी नाल्यांना पूर येऊन जनजीवन प्रभावित झाले आहे. अशातच आज बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त अधिकृत मद्य विक्री बंद असतांना मारेगावात मात्र अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.यावर अंकुश लावण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असतांना या व्यवसायाला नेमके पाठबळ कुणाचे ? यावरच आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
मारेगाव हे तालूक्याचे ठिकाण आहे. येथे चार अनुज्ञप्ती धारक आहे.यातील काही दुकानातून ग्रामीण भागात रोजच संध्याकाळी देशी दारू पेट्याची बिनधास्त रवानगी होत असते.त्यामुळे ग्रामीण भागातही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.या व्यवसायाने अनेक कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.
दरम्यान हाच प्रकार मारेगाव शहरात सुरू असून अनुज्ञप्ती धारकाचे दुकान उघडण्यापूर्वी भल्या पहाटे पासून मारेगावात हा गोरखधंदा सुरू असतो.
परिणामी आज सणानिमित्त मद्यविक्री बंद असतांना अवैध देशी दारूची विक्री शहरात जोमात सुरू आहे.याला नेमके पाठबळ कुणाचे ? हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनात घर करून आहे.यावर कारवाई का होत नाही ? की जाणीवपूर्वक दुर्लक्षाने या व्यवसायाला पाठबळ मिळत आहे.हे प्रश्न अनुत्तरित असतांना काही निवडक पोलिसांचे हात ओले झाल्याची खमंग चर्चा शहरात जोरकसपणे सुरू आहे.अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांनी तगडे आव्हानच पोलिसांसमोर उभे केले असतांना यावर लगाम घालण्याची मागणी होत आहे.सलग पावसाने ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन नागरिक प्रभावित झाले असतांना मारेगावात मात्र अवैध देशी दारू विक्रीचा महापूर आला असल्याचे विदारक चित्र काही चौकाचौकात बघावयास मिळत आहे.