नऊ महिन्याच्या मुलीला घेऊन आईने लावला गळफास
🔸️चिमुकली सुदैवाने बचावली .. आई दगावली
🔸️मार्डी येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील वडीलाच्या घरी विवाहितेने पोटच्या चिमुकलीस साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्येच्या प्रयत्नात नऊ महिन्याची बालिका सुदैवाने बचावली तर चोवीस वर्षीय आईचा करून अंत झाल्याची घटना आज मंगळवारला सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान उघडकीस आली.या घटनेने मार्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येथील अँटो चालक जितेंद्र वैद्य यांची एकुलती एक मुलगी रोशनी हिचा दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्हा हिंगणघाट तालुक्यातील शेखापुर येथे आशिष झाडे यांच्याशी झाला होता.त्यांच्या संसारवेलीवर नऊ महिन्याची गोंडस चिमुकली असतांना मागील दोन महिन्यांपूर्वी नियतीने डाव साधत पती आशिष यांचा मृत्यू झाला.
सासर सोडून माहेरी वास्तव्यात असलेली रोशनीने आज सकाळी घराच्या तिसऱ्या खोलीत नऊ महिन्याच्या चिमुकलीला घेऊन एकाच साडीच्या सहाय्याने गळफास लावला.नियतीला मान्य नसलेल्या चिमुकलीचा अलगद साडीचा फास निसटला आणि चिमुकली सुदैवाने बचावली मात्र आईच्या (रोशनी )गळ्याला साडीचा फास घट्ट आवळल्याने तिचा जागीच करून अंत झाला.या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.रोशनीच्या या दुर्देवी निर्णयाने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.