वाळू तस्करांनी तयार केला चक्क अवैद्य घाट ?
🔸करोडो रुपयाच्या महसूलला चुना🔸प्रशासकीय कर्तव्यावर प्रश्नचिन्ह
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा घाटावर काही महाभाग वाळू तस्करांनी चक्क अवैद्य घाट तयार करून अवैधरित्या वाळूची जोमात तस्करी सुरू केली आहे.त्यामुळे करोडो रुपयांच्या महसूल बुडीत निघत असतांना प्रशासकीय कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याची सर्वस्तरातून मागणी होत आहे.
मारेगाव तालुक्यात अवैद्य वाळू उपसा करीता मागील अनेक महिन्यापासून प्रचंड उत आला आहे. कोसारा घाटातून रात्री बेरात्री हा गोरखधंदा सुरू असतांना काही तस्करांनी आता चक्क अवैधरित्या घाटाची निर्मिती केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा , मारेगाव तालुक्यातील कोसारा , चिंचमंडळ येथील महाभागांनी हा शासनाला चुना लावण्यासाठी गोरखधंदा चालविला आहे.
मागील अनेक दिवसांपासून अवैद्य घाटाची निर्मिती करून करोडो रुपयांची वाळू तस्करी सुरू असतांना प्रशासकीय सेवेतील कर्मचारी कारवाईसाठी जाणीवपूर्वक अनभिज्ञ तर नाही ना ? असा प्रश्न व संभ्रम नागरिकांना पडला आहे.
दरम्यान वाळू तस्करीसाठी जवळपास अठरा ते वीस तस्करांची टोळी सक्रीय असल्याची विश्वसनीय माहिती आहे.घाटाची निर्मिती करीत जेसीबीच्या साहाय्याने रस्ताही करण्यात आल्याने यास नेमका वरदहस्त कुणाचा हा प्रश्न चव्हाट्यावर येत आहे .प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळूची दिवसरात्र तस्करी सुरू असतांना मात्र प्रशासनाची डोळेझाक प्रवृत्तीची चुप्पी तस्करांना रान मोकळे करून देत आहे.त्यामुळे करोडो रुपयांच्या महसूलला जबर फटका बसत आहे.