मारेगावात देशी दारूची चढ्या दराने विक्री
🔸सामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक
🔸संबंधित विभागाचे अनुज्ञप्ती धारकांना अभय
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव येथे देशी दारू दुकानातून मूळ किमतीला बगल देत चक्क दहा रुपये जास्त घेत एक १८० मि. ली.ची बॉटल (पव्वा) ७० रुपयाला विक्री करीत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.परिणामी संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अनुज्ञप्ती धारकांचे चांगलेच फावत आहे.
मारेगाव तालुकासह इतरत्र मद्यप्राशन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.देशी दारू ग्रहण करण्याचा ग्राहक हा सर्वसामान्य आहे.मात्र मारेगाव येथे अनुज्ञप्ती धारकाकडून ग्राहकांची कमालीची लूट चालविली जात आहे. धान्याच्या मध्यार्कात संत्राचा कृत्रिम स्वाद घालून तयार केलेली देशी दारू पव्वा ही १८० मि. ली.ची मूळ किंमत केवळ ६० रुपये असतांना ग्राहकाकडून दहा रुपये अधिकचे घेत ७० रुपयास विक्री करीत ग्राहकांची लूट करीत आहे.व्यसनाधीन झालेला ग्राहक हा निमूटपणे ही लूट सहन करीत आहे.एका सामंजस्य ग्राहकाने थेट अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यास सवाल केला असता दुर्लक्ष करण्याची सूचना केली.त्यामुळे कुणाचे हात ओले आहे यावरून स्पष्ट होत आहे.
मारेगाव तालुक्यात सर्वसामान्य ग्राहक हा देशी दारूच्या आहारी गेला असतांना अनुज्ञप्ती धारकाने चांगलाच गोरखधंदा चालविला आहे.संबंधित विभाग या लुटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा ग्राहकाकडून आरोप होत आहे.अबकारी प्रशासनाचे अधिकारी दोन महिण्यापूर्वी मारेगावात तपासणीसाठी आले असता त्या दिवसाला मात्र ग्राहकाकडून केवळ एका पव्वा चे ६० रुपयेच घेण्यात आले होते हे येथे उल्लेखनीय.
विशेष म्हणजे मागील अनेक महिन्यापासून अनुज्ञप्ती धारकांनी चालविलेल्या ग्राहकांच्या लुटीकडे व गोरखधंद्याकडे अबकारी विभाग सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने ग्राहकाची मात्र आर्थिकदृष्ट्या पिळवणूक होत आहे.