🔸 उच्च शिक्षित महिलेस दाखविला ठेंगा
🔸प्रशासनच आले संशयाच्या भोवऱ्यात
मारेगाव - दीपक डोहणे
तालुक्यातील भालेवाडी येथील पेसा अंतर्गत गावातील उच्च शिक्षित आदिवासी उमेदवार व गुणांकात प्रथम असलेल्या उमेदवारास सेविका पदाकरिता जाणीवपूर्वक डावलून वेगळ्याच उमेदवाराची नियुक्ती केल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे.नियुक्ती बाबत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असतांना प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या बोरी खुर्द येथे ग्रामसभा घेण्यात आली. यात वेगवेगळ्या विषयांकित ठराव घेण्यात येणार होते.मात्र काही संवेदनशील विषयांवर मतभिन्नता असलेले ही ग्रामसभा वारंवार तहकूब करण्यात येत होती.त्यामुळे येथील अंगणवाडी सेविका पदाची नियुक्ती दिवसभर रखडली.वेळ पुढे सरकत असतांना ग्रामसभेतून अनेकांनी घरचा रस्ता पकडला.
त्यामुळे सभागृहात काही निवडकांनी सचिवास विश्वासात घेत नियमाची पायमल्ली करीत थेट अंगणवाडी सेविका म्हणून कोमल दिलीप माफुर या महिलेची नियुक्ती केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.वास्तविक मेरिट यादी नुसार ८१.०० टक्के गुण प्राप्त सविता वासुदेव मेश्राम हिची निवड ही अनिवार्य होती मात्र केवळ ७५ टक्के गुण असलेल्या माफुर यांची नियुक्त कुठल्या निकषातून करण्यात आलीय बाबत प्रशासन वगळता सर्वच अनभिज्ञ आहे.विशेष म्हणजे माफुर ह्या मेरिट यादीत तब्बल पाचव्या क्रमांकावर आहे.प्रारंभीच्या चार उमेदवारांना का डावलले हे कोणत्या ज्योतिष्याला विचारण्याची गरज उरली नसली तरी मेरिट असलेली उमेदवारास नापास करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आल्याने प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगल्या जात आहेत.
सदरील गाव हे शंभर टक्के पेसा अंतर्गत असल्याने येथे आदिवासी बहुल उमेदवारांची नियुक्ती अपेक्षित असल्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र येथे पाणी मुरत सपशेल अनुसुचित जमाती उमेदवारास डावलून वेगळी नियुक्ती केल्याने याबाबत तीव्र आंदोलन छेडून प्रसंगी न्यायालयात दाद मागू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.ही बहुचर्चित नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या संदर्भात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी व गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून प्रस्तुत प्रतिनिधी यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही