नगरपंचायतचे पडघम...महाविकास चे युती समीकरण कुणाला तारणार ?
🔸पक्षांतर्गत बंडखोरी ठरणार डोकेदुखी
🔸पक्षाचा नाही ठिकाणा अन मला उमेदवार म्हणा चा तोरा अजेंड्यावर
मारेगाव : कैलास ठेंगणे
मारेगाव नगरपंचायत चे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात तीन स्वतंत्र विचारधारेचे पक्ष एका घटकात गुण्यागोविंदाने नांदत आहे. शिवाय वणी विधानसभेचा गुलाल भाजपाला लागल्यामुळे ही निवडणूक प्रथम दर्शनी माहविकास आघाडी विरुद्ध भाजपशी होणार असा कयास बांधायला हरकत नाही. परंतु मारेगाव नगरपंचायत मधील राजकीय पार्श्वभूमी पाहता राज्यातील युतीचे समीकरण इथे आखल्या गेले तर भाजपाला या निवडणुकीत शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी कष्ट करावे लागणार नाही.असेच स्वीकृत दर्शनी वाटत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे." पक्षाचा नाही ठिकाणा... अन उमेदवार मला म्हणा " असे म्हणत जो-तो निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा तोऱ्यात सध्यातरी वावरात आहे. मागील पंचवार्षिक मध्ये देशभरात मोदी लाट सुरू असताना सुद्धा मारेगाव नगरपंचायत मध्ये मात्र भाजपाला फारसे काही हाती लागले नव्हते. याही निवडणुकीत भाजपाचे परिस्थिती फारशी वेगळी नाही.
यावेळी महा विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सक्षम उमेदवाराचा गुंता सोडवणे हे आघाडीतील पक्षश्रेष्ठी समोर मोठे आव्हान ठरणार आहे.त्यातच काही प्रभागात जबरदस्त पकड निर्माण होत असलेल्या स्वराज्य युवा शेतकरी संघटनेच्या मोर्चेबांधणी कडे दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल तर आगामी काळातील निवडणुकीत ही संघटना हुकमी एक्का बनेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची संभाव्य शक्यता आहे. इच्छुकांची संख्या पाहता पक्षांतर्गत बंडखोरीचे चिन्हे दिसत आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील उमेदवाराला आव्हान देत निवडणुकीत पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे आणि बंडखोर रुपी माकडांच्या भांडणात भाजप रुपी मांजर सत्ता रुपी लोणी खाऊन टाकेल असे राजकीय समीकरण महा विकास आघाडीतील घटक पक्षातील युती न झाल्यास पायला मिळाल्यास नवल वाटायला नको.