🔸मारेगाव येथील संशायित आरोपी राहुल सूर पसार...
🔸अटकेसाठी पोलीस मागावर !
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील वेगाव येथे आज शुक्रवारला सकाळी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांच्यावर मारेगाव स्थित युवक राहुल सूर याने दगडाने हल्ला चढविला.या गंभीर घटनेची तक्रार सायंकाळी दाखल होताच संशायित आरोपी राहुल सूर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वेगाव येथील वास्तव्यात असलेले जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर हे सकाळी नऊ वाजताचे दरम्यान बाहेर जाण्याच्या तयारीत मोटारसायकल वर बसले.गावात दबा धरून बसलेल्या दुचाकीने मागावून येत राहुल सूर याने भलामोठा दगड देरकर यांच्या डोक्यावर आदळला.दुचाकी बाजूला सारून देरकर यांना भोवळ येत असताना सूर याने बेसूरपणे दुसऱ्यांदा दगडाचा प्रहार केला.यात देरकर यांच्या पायाला इजा झाली.हा थरार करून राहुल सूर ने घटनास्थळावरून पोबारा केला. जखमीवस्थेत देरकर यांना मारेगाव रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूरला हलविले.
प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्यागत स्वतः देरकर यांनी राहुल सूर याचे विरोधात सायंकाळी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली.प्राणघातक हल्ल्याची गंभीरता पाहून घटनास्थळावरून पोलिसांनी दगड जप्त केला. संशायित आरोपी राहुल जनार्धन सूर रा.शांती नगर मारेगाव याचेवर जिवेमारण्याचा प्रयत्न , कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला .पोलीस निरीक्षक राजेश पुरी व पोलीस पथक संशायित आरोपीच्या अटकेसाठी मागावर आहे.
करविता वेगळा असल्याचा देरकर यांचा आरोपलोकाभिमुख कार्य व जनमानसांचा गोतावळा माझ्या सदैव पाठीशी असल्याने सामाजिक व राजकीय द्वेषातून माझ्यावर प्राणघातक हल्ल्याचा कट रचण्यात आला.सूर याने हल्ला केला असला तरी याचा करविता वेगळाच असल्याचा आरोप अनिल देरकर यांनी केला.आरोपीस तात्काळ अटक करून निःपक्ष चौकशी केल्यास या गंभीर घटनेचे गूढ जनतेसमोर येईल असा आशावाद विदर्भ सर्च न्यूज शी बोलतांना देरकर यांनी व्यक्त केला.