Type Here to Get Search Results !

मुसळधार पावसाने उडाली शेतकऱ्यांची त्रेधातीरपट

🔸रात्री पडला १६.०० मिमी. पाऊस
🔸कापूस, सोयाबीन झाले ओले चिंब
🔸अस्मानी संकटाचा प्रकोप , बळीराजाची आर्थिक घडी विस्कटली

मारेगाव : दीपक डोहणे
कृषी प्रधान देशाच्या पोशिंद्याच्या मागावर संकटाची मालिका कायम असतांना यंदाच्या पावसाळ्यात सलग दिड महिना पाऊस पडून पिकांची हालत खलसा केली.काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारच्या मध्यरात्री पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री करून कापूस व सोयाबीन या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान केले.त्यामुळे उत्पादनात शेतकऱ्यांची पुरती त्रेधातीरपट उडून आर्थिक घडी विस्कटली. सततच्या संकटाने बळीराजा संकटाच्या खाईत लोटल्या जात आहे.
मारेगाव तालुक्यात प्रमुख व्यवसाय असलेल्या शेती वर तालुक्याची बाजारपेठ आहे.किमान ४५ हजार पेरणी योग्य क्षेत्र असलेल्या शेतात शेतकरी वर्ग कपाशी व सोयाबीन आणि तूर हे मुख्य पिके घेतात.तालुक्यात शेतीच्या भरवशावर कौटुंबिक कार्य करून कमीजास्त प्रमाणात दिवसे समोर ढकलतात.सरकारी , खाजगी व काही वस्तू गहाण करीत यंदा उत्पादनात भरभराट होईल या अपेक्षेने मृग नक्षत्रात शेतीचे नियोजन करून पेरणी केली.काळ्या आईला हिरवा शालू नेसविला.मात्र यंदाच्या पावसाच्या सातत्याने पिकांची वाढ खुंटली.शेतीला काही दिवसातच बहर येऊन पांढरे सोने आणि सोयाबीन घरी आणण्याचे  नियोजन आखत असतांना शनिवार ला मध्य रात्री मुसळधार रट्टा पावसाने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान केले.त्यामुळे ओला चिंब झालेल्या कापसाने व सोयाबीनंने   शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली.झाडावरील कापूस ओला असल्याने त्याला गळती लागणार आहे या सोबत फळधारणा खाली पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ओल्या कापसाला विक्रीसाठी खाजगी व्यापारी अत्यल्प दराने खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करणार हे आता कुण्या ज्योतिष्याला विचारण्याची गरज उरली नाही.सोयाबीनचे उत्पन्न बऱ्याचअंशी शेतकऱ्यांच्या घरात आले मात्र शेतातील शिल्लक सोयाबीन या पावसाने खराब होऊन कोंब फुटण्याची शक्यता आहे.एकूणच शेतकऱ्यांच्या नशिबी अस्मानी व सुलतानी संकट मागावर असतांना आर्थिक संकट गडद होत आहे. तर रात्रीच्या पावसाने तालुक्यात १६.००   मिमी. नोंद केली. आजतागायत मारेगाव तालुक्यात ६५३.५१  मिमी. पाऊस पडल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies