▪️ वेगाव केगाव रस्ता गेला खड्ड्यात
▪️ वेगाव केगाव रस्त्याला लोकप्रतिनिधी चा शाप की वरदान ?
▪️नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
विदर्भ सर्च न्यूज | संतोष बहादुरे
मारेगाव(११. ऑक्टो) तालुक्यातील वेगाव ते केगावला जोडणाऱ्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने दुचाकी तर सोडा बैलगाडी चालविणे देखील कठीण झाले आहे.लोकप्रतिनिधीचा शाप लागलेल्या रस्त्याकडे येथील नागरिक दुरुस्तीसाठी आवासून उभे आहे.
गेल्या सहा वर्षापूर्वी वेगाव ते केगाव जोडणारा तीन ते चार किलोमीटर चा रस्ता निर्माण करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम वेगाव येथील जिल्हा परिषद शाळे पासून एक किमी अंतरावर असलेले जेनेकर यांच्या शेतापर्यंत पूर्ण करण्यात आले. उर्वरित काम अर्धवट ठेवण्यात आले ते अजूनही जैसे थे आहे.
मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केला तसेच येथील लोकप्रतिनिधींनी या मार्गाला जणू खड्डेमय मार्ग म्हणून मोठा शाप दिला आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त शापाने वेगाव व केगावकर चांगलेच शापित झाले आहे. प्रशासनांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा या मार्गाची दुरुस्ती न करण्यामागचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. दोन्ही गावाला जोडणारा रस्ता मध्ये जो पूल आहे त्यामध्ये मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या शेतमजूर,शेतकरी व इतर वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच हे खड्डे आकाराने दोन ते तीन फूट लांब आहे. त्यामुळे समोर मोठा अपघात होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या 15 दिवसात मध्ये पूलाचे तसेच रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.दरम्यान बोथट बनलेल्या व्यवस्थेला व कुंभकर्णी झोपेतील लोकप्रतिनिधींना केव्हा जाग येईल याबाबत येथील नागरिक मात्र साशंकतेच्या नजरेने पाहत आहे.