जिममध्ये व्यायाम करताना सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचा मृत्यू
सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचा जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला.
सोलापूर : पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचा बुधवारी (ता. ११) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ते ५६ वर्षांचे होते. या घटनेमुळे पोलिस खात्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले हे आज बुधवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करीत होते. सुरवातीला ते चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतरही त्यांनी व्यायाम चालू ठेवला आणि दुसऱ्यांदा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या वेळी तेथील जिम ट्रेनरने त्यांच्या छातीला थोडा पंपिंग करण्याचा प्रयत्न केला आणि लगेच सर्वांना एकत्रित करून सुहास भोसले यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गाडीत बसवले अन् हॉस्पिटलला पाठवले होते. परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी एक चोरीची घटना घडली होती. त्या वेळी सुहास भोसले हे तातडीने घटनास्थळी हजर होऊन सर्वांना धीर दिला होता. "आम्ही आहोत काळजी नको. दोन दिवसांत सर्व ठीक होईल' असे ते म्हणाल्याची आठवण पत्रकारांमधून व्यक्त होत असून, एका चांगल्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलिस प्रशासनाला धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: एफआरपी व्याजासह द्या! प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्यांना आदेश
सुहास भोसले हे पोलिस आयुक्तालयाच्या डिव्हिजन क्रमांक एक या ठिकाणी विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. १ एप्रिल २०१९ रोजी अमरावतीहून त्यांची बदली झाल्याने ते सोलापुरात दाखल झाले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती कळतात हॉस्पिटलमध्ये पोलिस प्रशासनातील अधिकारी व पत्रकारांनी गर्दी केली होती