Type Here to Get Search Results !

आमदार निलेश लंके यांची आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण

आमदार निलेश लंके यांची आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण

आरोग्य कर्मचाऱ्याला घरून बोलावून घेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप


अहमदनगर : कोरोना काळात कोविड सेंटरच्या वतीने रुग्णसेवेसाठी चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके नव्या वादात अडकले आहेत. पारनेर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला त्यांनी पोलिस निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या समोरच मारहाण केली. लसीकरणाचे टोकन विकत असल्याचा आरोप करून कर्मचाऱ्याला घरून बोलावून घेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांना पत्र पाठवून याची माहिती दिली असून कारवाईची मागणी केली आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजता ग्रामीण रुग्णालयात पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच ही घटना घडली आहे.
 पारनेरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चार ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजता पारनेर ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लसीच्या लाभार्थ्यांना टोकनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता आमदार निलेश लंके आणि डॉ. कावरे यांनी टोकन वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल दिलीप पाटील यांना घरून बोलावून घेतले. त्यांच्यावर टोकन विकण्याचे आरोप करण्यात आला. त्याची कोणतीही शहानिशा न करता आमदार निलेश लंके यांनी राहुल पाटील यांना मारहाण केली. रुग्णालयात कार्यरत असणार्‍या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. उंद्रे व डॉ. अडसुळ यांनाही शिवीगाळ करण्यात आली. ही घटना गटविकास अधिकारी माने आणि पोलिस निरीक्षक बळप यांच्यासमोर घडली. या घटनेची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक बळप यांनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उमटले आहेत. आता वरिष्ठ अधिकारी यासंबंधी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. संबंधित कर्मचाऱ्याने अद्याप तक्रार दिलेली नसली, तरी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन जिल्हा मुख्यालयाला लेखी कळवून कार्यवाहीची मागणी केली आहे. यासंबंधी आमदार लंके यांची भूमिका समजू शकली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies