पाच महिन्यात झाला प्रेमाचा रंग बेरंग..!
मारेगाव येथील प्रियकरा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
संशायित पसार,शोधार्थ पोलिस पथक रवाना
मारेगाव : सचिन मेश्राम
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.असे कवी मंगेश पाडगावकर यांनी प्रेमाची व्याख्या काव्यातून शब्दबद्ध केली.मात्र अलिकडच्या हायटेक जमान्यात प्रेमाचे तरंग बदलतांना दिसतेय.किंबहूना प्रेमाचा रंग बेरंग होतांनाचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते.प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात काही पुढे नेतात तर काही मागे..असाच काहीसा प्रकार मारेगावात पुढे सरकला.चक्क गरोदर असलेल्या प्रेयसीने प्रियकरा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली अन बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्तर्गत गुन्हा दाखल झाला.तुर्तास संशायित पसार असुन मारेगाव पोलिस त्याच्या शोधार्थ पालथे घालत आहे.
' तो ' आणि ' ती ' एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडाले.नव्हे तर या प्रेमयुगुलांनी प्रेमाला उपमा नाही..हे देवाघरचे देणे म्हणत पाच महिन्यापूर्वी पलायन केले.तो वयात पण ती अल्पवयीन.सुरवातीलाच मारेगाव तालुक्यातील त्याच्या नातेवाईकाकडे गेले.त्यांनी सखोल चौकशी अंती अवाक होत तू तुझा लपंडाव दुसरीकडे मांड म्हणत समज दिली.इकडे तिच्या आईने मागील डिसेंबर मध्ये मारेगाव पोलिसात मुलीला पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली.त्यानूसार पळवुन नेल्याचा गुन्हा नोंद झाला होता.
प्रेमाने गुजराण होणार नाही याची शाश्वत कल्पना आलेल्या या युगुलांनी चंद्रपुर जिल्ह्यातील नारंडा गाव गाठत बस्तान मांडले.तो मोलमजुरी करित ती अल्पवयीन असल्याने लग्न न करताच संसाराचा गाडा हाकू लागला.अशातच दोघातील प्रेमाचा रंग फिका पडत असतांना शाब्दिक खडाजंगी होवू लागली.या खडाजंगीने पुरती बेभान झालेल्या ती ने थेट मारेगाव पोलिस स्टेशन गाठले व त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिस सुत्रातुन तिच्या सखोल चौकशी अंती मेडिकल करण्यात आल्यानंतर अंकुर वाढत असल्याची बाब पुढे आली.प्रकरणातील गंभीरता पाहून पोलिसांनी संशायित संतोष दत्ता चौघुले (२६ ) रा.मारेगाव याचेवर बाल लैंगिक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याची कुणकून लागताच संशायित पसार झाला.त्याच्या शोधार्थ मारेगाव पोलिस पथक चहुबाजुला रवाना झाले आहे.