" अमृतमहोत्सव विशेष "
बा स्वातंत्र्या... कसा लावू जी तिरंगा....!
🔸मारेगाव तालुक्यातील शिवनाळाच्या वृद्धेची तिरंगी व्यथा
मारेगाव : दीपक डोहणे
घरचा म्हातारा गेला आता माझा कोणी वाली नाही.कातर डोळ्यातून वाहणारे अश्रू कोण पुसणार.कुठे तिरंगा लावू आणि कोणता आनंद साजरा करू जी..असा आर्त सवाल रुखमाबाई करीत आहे.
दऱ्याकपारी , खेड्या पाड्यात विखुरलेला आदिवासी बहुल मारेगाव तालुका.सदा सर्वकाळ अज्ञानात , गरिबीत पिचलेला कोलाम समाज , अशा साध्याभोळ्या कोलाम जमातीची आडवळणावर वसलेले शिवनाळा हे गाव. त्यात चंद्रमौळी झोपडीत आयुष्याची मावळती संध्याकाळ घालवणारी रुखमाबाई कवडू आत्राम.
एकीकडे संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा होत आहे.प्रत्येक शासकीय कार्यालय लाखो रुपयांचे फ़ुलं , फुगे व रोषणाईने नटली व सजली असतांना घरोघरी तिरंगे दिमाखात लहरतांना ग्रामीण भागात याबाबत किती उत्सुकता पसरली हे जाणण्यासाठी 'विदर्भ सर्च न्यूज नेटवर्क' ने मारेगाव तालुक्यातील शिवनाळा चा कानोसा घेतला असता ७५ वर्षाच्या परिपक्व झालेल्या भारत देशात तेवढ्याच वर्षाची लख्ख म्हातारी रुखमाबाई निराश मुद्रेत चंद्रमौळी झोपडी समोर बसून दिसली.
रुखमाबाई आणि भारत माई या दोघांच्या नशिबाचं प्राक्तन तेवढंच उदासवाणं अन भयावह.अणुबाँम्ब पडल्यानंतर अवघ्या वीस वर्षांत बेचिराख झालेल्या जपान ने स्वतःला सावरत उत्तुंग भरारी घेतली. मात्र ७५ वर्ष उलटून सुद्धा भारतात अशा शेकडो गरिबांच विदीर्ण वास्तव दर्शविणारी रुखमाबाई ही प्रातिनिधिक उदाहरण.घरकुलच्या प्रतीक्षा यादीत नाव येऊन आता घरकुल मिळणार याची प्रतीक्षा करत करत तिच्या सौभाग्याच लेणं देवाघरी गेलं.प्रतिक्षाचं हे जिणं आता रुखमाबाईच्या नशिबी आलं.
जबाबदारी झटकणारे तिचे मुलंमुली आणि मायबाप सरकार दोघेही तेवढेच दोषी.या हात झटकण्याच्या वृत्तीने अन प्रवृत्तीने रुखमाबाई शिवनाळा येथे जर्रजर्र झोपडीत एकटीच मरणयातना सहन करत जीवन कंठीत आहे.सप्तरंगाची उधळण करीत अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या उत्सवाची रुखमाबाई सारखी कर्मकहाणी मोठा हादरा देऊन जाते.या देशाचं भीषण वास्तवही तिच्या डोळ्यात झळकून जाते. बा.. स्वातंत्र्या , नको आम्हा तिरंगा..उसवलेल्या जिंदगीला दे एक निवारा..! याच ओळी स्वातंत्र्यदिनी रुखमाबाईचं फाटकं आयुष्य कोणी शिवेल का ? असा अनुत्तरीत प्रश्न कायम ठेवून जातात.