कोंबड बाजारावर पोलिसांची धाड
🔶सव्वा लाखाच्या मुद्देमालासह सात आरोपींना अटक
वणी :- प्रतिनिधी
तालुक्यातील धोपटाळा गावा नजिक असलेल्या तलावा मागील जंगल परिसरात कोंबड बाजारावर छापा टाकून झुंजीच्या कोंबड्यासह १ लाख ३४ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी लावणाऱ्या ७ आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही आज ३ एप्रिलला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक माया चाटसे यांना धोपटाळा तलावा मागिल जंगल भागात कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती गुप्तचरांनडुन मिळाली. या माहितीच्या आधारे कोंबड बाजारावर धाड टाकली. त्या ठिकाणी काही ईसम कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळतांना आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी कोंबड बाजार भरवून पैशाची बाजी लावणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून रंगेहात अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये संदिप दामोधर वनकर (३५) रा. गणेशपूर, स्वप्नील रामचंद्र बरडे (३३) रा. माजरी वस्ती, मंगेश महादेव जुनगरी (३८) रा. रा. पेटूर, गणेश भालचंद्र आवारी (२४) रा. पिंपळगाव, उमेश किशोर झगझाप (२५) रा. मोहुर्ली, प्रज्वल विठ्ठल राऊत (२५) रा. जैन ले-आऊट, चरणदास मनोहर लेनगुळे (४४) रा. शिरपूर याचा समावेश आहे. त्यांच्यावर माजुका च्या कलम १२(ब),१२(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक झुंजीचा कोंबडा, नऊ लोखंडी धारदार काती, दोन मोटर सायकल, सात मोबाईल हँडसेट व ४ हजार ६९० रुपये रोख असा एकूण १ लाख ३४ हजार ९९० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे, पोहेकॉ दिगांबर किनाके, पोना विठ्ठल बुरुजवाडे, सचिन मरकाम, संजय शेंद्रे, पोकॉ भानुदास हेपट, वसीम शेख, सागर सिडाम, गजानन गोंडबे, यांनी केली.