🔸शिक्षण विभागाचा जावई शोध
🔸शिक्षणाचा खेळखंडोबा अन शिक्षकांची होणार परवड
मारेगाव : कैलास ठेंगणे
मागील दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर देखील परिणाम झाला असताना ,शासनाने एका नव्या आदेशाने तालुक्यातील १०५ शाळातील सादिल खाते तालुका स्तरापासून १६ किमी अंतरावर असलेल्या चिखलगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उघडण्याची सक्ती केल्याने शिक्षकावर अतिरिक्त ताण वाढला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची नौका डूबणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत १०५ शाळा कार्यरत आहे . या शाळेतील समग्र शिक्षा अभियानाचे खाते सेंट्रल बँक ऑफ इंडिया मारेगाव च्या शाखेत होते .या शाखेत खाते असल्यामुळे शिक्षकांना सोयीचे व सवलतीचे होते .मात्र शिक्षण विभागाच्या एका अजब गजब आदेशाने तालुक्यातील सर्व शाळांची सादिल खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिखलगाव येथे ३० ऑक्टोबर पर्यंत काढण्याचे आदेश देण्यात आले आहे.त्यामुळे तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शाळेतील शिक्षकांना तालुका स्तरावरुन १६ की मी केवळ बँकेत जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
जिल्हा परिषद शाळेला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जातात .विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण तज्ञ अहोरात्र झटत आहेत. खर्चाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत शिक्षण मिळावे म्हणून शालेय पोषण आहारापासून स्वच्छते पर्यंत सर्व सुविधा उभारण्यात आलेले आहेत .मात्र या सुविधा आता विद्यार्थ्यांसह शिक्षकासाठी डोकेदुखी ठरणार आहे. तालुक्यातील ३० शाळा एक शिक्षिका आहेत तर ४५ शाळा दोन शिक्षिका आहे. १०५ शाळांमध्ये ३०५ शिक्षकांची पदे मंजूर आहे मात्र २५९ शिक्षक कार्यरत आहे तब्बल १०६ शिक्षकांची कमतरता आहे.
शिक्षकांना केवळ बँकेच्या व्यवहारा करिता संपूर्ण दिवस जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे . या गंभीर बाबीकडे जिल्हा शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.