🔸ऐंशी नव्वद च्या दशकात दिली होती मारेगाव तालुक्यात शिवसेनाला उभारी
🔸बातमीदार पंकज नेहारे यांना पितृशोक
मारेगाव : प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश किसनाजी नेहारे( ६०) रा. मारेगाव यांचे अल्पशा आजाराने चंद्रपूर येथे आज शुक्रवारला १२.२० वाजताचे दरम्यान निधन झाले.मारेगाव येथील मराठी दैनिकाचे प्रतिनिधी पंकज नेहारे यांचे ते वडील होते.
श्री.सुरेश नेहारे हे मागील चार दिवसापूर्वी स्वगृही प्रसाधन गृहात पडले होते.त्यांना लगेच चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटर वर असतांना त्यांची प्राणज्योत मालविली.
सन १९८०-९० च्या दशकात त्यांनी राजकारणात उडी घेत शिवसेनेत प्रवेश केला होता.लगेच जिल्हा पक्ष प्रमुखांनी उभरता शिवसैनिक म्हणून सुरेश नेहारे यांच्यावर ' तालुका शिवसेना प्रमुख म्हणून ' जबाबदारी सोपविली होती. तालुका शिवसेना प्रमुख म्हणून ते शिवसेनेचे मारेगाव तालुक्यातील प्रथम शिवसेनाप्रमुख होते.तालुक्यातील शिवसेनेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तालुक्यात शिवसेनेचे यशस्वी जाळे विणले.मोठा जमघट तयार करून तालुका प्रमुख म्हणून वेगळी ओळख निर्माण करीत नेहारे यांनी पक्षाला कमालीची उभारी देत गाव पातळीवर शाखा स्थापन केल्यात आणि शिवसैनिक प्रत्येक गावात तयार करण्यात त्यांनी पक्षाची व पदाची यशस्वी धुरा सांभाळली होती .मारेगाव तालुक्यात शिवसेनेचा जन्म होताच सुरुवातीलाच तालुकाप्रमुख होत त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.कालांतराने पक्षातील वैयक्तिक मतभेद व गटातटाने नेहारे यांनी माघार घेत राजकारणाला पूर्ण विराम दिला होता.
परिणामी आज अल्पशा आजाराने त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. सुरेश नेहारे यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , एक मुलगी , नातवंड असा आप्तपरिवार आहे.आज सायंकाळी मारेगाव येथील स्मशानभूमीत त्यांचेवर संध्याकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.