Type Here to Get Search Results !

चाळणी झालेल्या रस्त्यासाठी मनसेचे बेमुदत उपोषण

🔸आबई ते ढाकोरी मार्गाची दुरावस्था
🔸 ...अन्यथा अधिकारींच्या खुर्चीखाली फोडा रे फटाके आंदोलन -राजू उंबरकर यांचा गर्भित इशारा

वणी : संतोष बहादूरे
मागील अनेक वर्षांपासून आबई फाटा ते ढाकोरी बोरी मार्ग अनेकांचे कंबरडे मोडत असून प्रशासनाकडून कायम दुर्लक्षित असलेल्या रस्त्यासाठी  मनसेने उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन छेडले आहे.मागील चार दिवसांपासून पोकळ आश्वासनाची खैरात करणाऱ्या अधिकार्यांच्याच खुर्चीखाली फोडा रे फटाके चे अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याचे गर्भित इशारा राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

      वणी तालुक्यातील आबई बोरी रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.गिट्टी उखडून बाहेर पडल्यागत मोठमोठे खड्डे पडले आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बेताल भूमिकेने या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.मागील अनेक वर्षांपासून प्रवासी नरकयातना सहन करीत असताना विकासाला येथे भोपळा मिळतो आहे.येजा करणाऱ्या दुचाकी स्वारांचे कंबरडे , मणक्याचे असह्य त्रासाने व अनेकांच्या अपघाताने हा रस्ता मृत्यूला आमंत्रण देत आहे.
    
      चालणे अवघड बनलेल्या या रस्त्याकडे सोयरसुतक नसलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या निगरगट्ट भूमिकेने नागरिकांत संतापाची लाट उसळते आहे.किंबहुना  रस्ता दुरुस्तीचे  तात्काळ काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार,प्रवीण डाहूले,मंगेश दुरुटकर,प्रकाश कुंडेकर,निखील मालेकर,सारंग येडे,अरविंद राजूरकर,मनोज ठावरी,सूरज डोहे यांनी मागील चार दिवसांपासून मनसे शिलेदारांनी उपोषण सुरू केले आहे.

  ....तर खुर्ची खाली फटाके फोडू
           सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम असतांना हे आंदोलन आता उग्र रूप धारण करणार आहे.जनसामान्यांच्या संवेदनशील प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केल्यास तर अधिकाऱ्यांच्या खुर्ची खाली फटाके फोडू व दिवाळी साजरी करून त्यांचे दिवाळे काढू असा सज्जड दम मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडते आहे.या इशाऱ्याने प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला-उपअभियंता परळीकर
आंदोलन स्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार परळीकर यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी सांगोपांग चर्चा केली.रस्ता दुरुस्तीची मागणी कायम असतांना सदरील रस्त्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला.मंजूर होताच रस्त्याचे काम जलदगतीने मार्गी लावू असे अभिवचन दिले मात्र उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने हे आंदोलन आता वेगळे रूप धारण करण्यावर येऊन ठेपले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies