🔸दुर्लक्षित कारभारामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
🔸बकालपणाचे निरसन करा अन्यथा आंदोलन
मारेगाव : दीपक डोहणे
लाखो रुपयांचा घनकचरा टेंडर केवळ देखावा ठरू पाहात असलेल्या नगरपंचायतच्या बोथट व्यवस्थेने कळस गाठला आहे.अस्वच्छतेचे माहेरघर बनलेल्या मारेगाव शहरात विविध रोगाने डोके वर काढले असून प्रशासन कर्मचाऱ्यांच्या निगरगट्ट भूमिकेने काहींजन डेंगी सदृश्य आजाराचे बळी ठरले. त्यामुळे फवारणी, नाली सफाई व स्वच्छतेची कास धरावी अन्यथा नगरपंचायत समोर आंदोलन छेडण्याचा गर्भित ईशारा प्रभाग क्रमांक १६/१७ येथील नागरिकांनी दिला आहे.
शहरातील बहुतांश प्रभागातील नाली तुडुंब भरून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.येथील फॉगिंग मशीन केवळ नाममात्र असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील दुतर्फा रस्त्याने केरकचरा वाढला असतांना सरपटणारे प्राणी घरात शिरत आहे आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लाखो रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन मात्र नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे.स्थानिक निगरगट्ट प्रशासनाच्या कायम दुर्लक्षितपणाने शहराची बकाल अवस्था झाली आहे. दिवसागणिक अस्वच्छतेने आजाराचे प्रमाण वाढत असतांना प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.डेंगी आजार व डास वाढण्यासाठी प्रयत्नशील ठरलेल्या नगरपंचायत कर्मचारी यांना नागरिकांनी सूचना केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळे होण्यास धन्यता मानून नागरिकांच्या जीवावर हे प्रशासन उठले आहे.शहराच्या अस्वच्छतेने व डासांच्या प्रादूर्भावाने दोघांना जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे तात्काळ फवारणी , नालीसफाई सफाई करण्यात यावी अन्यथा येत्या सहा नोव्हेंबर पासून थेट नगरपंचायत कार्यालय समोर आंदोलन छेडण्याचा ईशारा प्रभाग क्रमांक १६/१७ येथील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.यावेळी आकाश भेले , राहुल राठोड, चेतन मोते, स्वप्निल गजभिये, तुषार पवार, वैभव नक्षणे, सौरभ ठावरी, महेश भेले, पंकज मेश्राम,अमोल मलकापुरे आदींची उपस्थिती होती.
