🔹चिंचमंडळ येथील सत्तापिपासुंनी केला घोळ ; संभाव्य लाभार्थ्यांत संतापाची लाट
🔹खुद्द ग्रा.पं. सदस्याची मुख्यमंत्री यांचेकडे तक्रार
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणे
मारेगाव , (३० सप्टें.) किमान आयुष्य काढण्यासाठी आपल्या हक्काचं चौकोनी छत असावं ही सर्वसाधारण नागरिकांची इच्छा असते.मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे भल्याभल्याचे स्वप्न दिवास्वप्न राहते.म्हणून शासनाकडून घरकुलाच्या विविध योजना कार्यान्वित केल्या जाते मात्र या योजनेला तालुक्यातील चिंचमंडळ येथे राजकीय ग्रहण लागले आहे.प्रस्तावित झालेल्या यादीतील लाभार्थ्यांचे नावेच बेपत्ता झाल्याने किमान ३१ संभाव्य लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बेताल सत्तापिपासूच्या उर्मट स्वभावाचा परिपाक गरीब लाभार्थ्यांच्या माथी पडणार असल्याने याची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तक्रार येथील महिला ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री सातपुते यांनी थेट मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांचेकडे केल्याने खळबळ उडाली आहे.
अडीच हजार लोकवस्ती असलेले मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ गाव.येथे घरकुल लाभार्थ्यांची प्रस्तावित यादी तयार करण्यात आली.१८० संभाव्य घरकुल लाभार्थी समाविष्ठ करण्यात आल्यानंतर पंचायत समिती स्तरावर पीडीएफ फाईलमध्ये केवळ १४९ लाभार्थ्यांच्या समावेश करण्यात आला.किमान २७ घरकुल लाभार्थींची नावे त्रुटी मध्ये दाखवून त्यांची बोळवण करण्यात धन्यता मानण्यात येते आहे.किंबहुना यातील ३१ जणांची नावे नेमकी कशी आणि कुठे गेली याबाबत पंचायत समितीचा विभाग च अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तर संभाव्य घरकुल लाभार्थ्यांत संतापाची लाट उसळत आहे.याबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उभे होत आहे.यातील ३१ लाभार्थी घरकुल योजने पासून कायम वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात असताना या गंभीर बाबीला नेमके कोण दोषी आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता तक्रार थेट मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या दालनात ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री सातपुते यांनी पोहचविली आहे.
विशेष म्हणजे येथे ज्यांच्याकडे स्लॅबचे मकान , विस्तारलेल्या शेतजमिनी आहे त्यांचे नावे घरकुल यादीत समाविष्ठ करण्यात आल्याचा आरोप आहे मात्र चौकोनी छता करिता आवासून प्रतीक्षेत असलेले लाभार्थीचे मात्र नावे गाळण्यात धन्यता मानण्याचा सोयीस्कर प्रयत्न येथील सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप सौ.सातपुते यांनी केला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत ही घरकुल योजना बेघर ,कच्चे घर असलेल्यांना घरकुल बांधकाम करिता अर्थसहाय्य देणे हा खरा उद्देश असतांना येथे मात्र नियम व अटीला पूर्णतः बगल देण्यात आली यास जबाबदार असणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि पंचायत समिती प्रशासनाने प्रत्यक्षात घरपोच सर्व्हे करून गरजू लाभार्थ्यांची घरकूल साठी निवड करावी अन्यथा आमरण उपोषणाच्या माध्यमातून पिडितांच्या मागणीसाठी पंचायत समिती समोर न्याय मागू असा गर्भित इशारा ग्रा.पं. सदस्या भाग्यश्री दिवाकर सातपुते यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव जी ठाकरे , ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ , जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीतून दिला आहे.