राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात
राज्यपाल कोश्यारी आज नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती
हिंगोली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यपाल कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला आहे. या अपघातात 3 गाड्यांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती आहे.
राज्यपालांकडून विकासकामांचा आढावा
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयीसुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याचे राज्यपालांना या बैठकीतून समजले. हिंगोली जिल्ह्यात केवळ 35 टक्क्यांपेक्षा कमी सिंचन क्षेत्र असल्याचे या बैठकीतून त्यांना माहिती मिळाली. काही इतर विकास कामे प्रलंबित आहेत, त्याचा आढावा राज्यपालांनी घेतला. जिथे जिथे विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत, याबाबत आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांना रिपोर्ट सादर करणार आहोत असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांना सांगितले.
‘मी कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्न नाही’
राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचे काम करतोय, असे राज्यपालांनी स्पष्ट केले. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हणाले.